भारतीय अर्थसंकल्प – व्याख्या, प्रकार, सार्वजनिक वित्त | Indian Budget information in Marathi
प्रस्तुत लेखामध्ये आपण भारतीय अर्थसंकल्प कसा असतो? अर्थसंकल्पाचे प्रकार, सार्वजनिक वित्त राजकोषीय धोरण या बाबींचा अभ्यास करणार आहोत.
तसेच अर्थसंकल्पामध्ये असणारी तूट भरून काढण्यासाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब केला जातो याची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. भारतीय अर्थसंकल्प
भारतीय अर्थसंकल्प – राजकोषीय धोरण/सार्वजनिक वित्ताचे धोरण –
सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात. शासन राजकोषीय धोरण जमाखर्चाचे वार्षिक विवरणपत्र मांडून जाहीर करते. याला शासनाचा अर्थसंकल्प असेदेखील म्हणतात. शासकीय अर्थसंकल्प –
अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट असे म्हणतात. बजेट हा शब्द सर्वप्रथम 1733 मध्ये इंग्लंड मध्ये वापरण्यात आला.
व्याख्या : येणाऱ्या आर्थिक वर्षातील शासकीय जमा खर्चाच्या आराखड्यास अर्थसंकल्प म्हणतात.
भारतीय अर्थसंकल्पाची सुरुवात स्वातंत्र्यापूर्वीच 7 एप्रिल 1860 रोजी झाली. तत्कालीन वित्त सदस्य जेम्स विल्सन यांनी हा पहिला अर्थसंकल्प मांडला. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प श्री. आर. के. षण्मुखम शेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी मांडला. भारतीय अर्थसंकल्प
भारत सरकारचा अर्थसंकल्प (भारतीय अर्थसंकल्प) पुढील दोन विभागात असतो.
१)महसुली अर्थसंकल्प.
२)भांडवली अर्थसंकल्प.
महसुली अर्थसंकल्पात महसुली किंवा चालू खात्यावरील जमा व खर्चाचा समावेश असतो. तर भांडवली अर्थसंकल्पात भांडवली खात्यावरील जमा व खर्चाचा समावेश असतो.
भांडवली अर्थसंकल्प
भांडवली अर्थसंकल्पात भांडवली जमा व खर्चाचा समावेश होतो. भांडवली खर्च म्हणजे मालमत्ता निर्माण करण्यासाठी होणारा खर्च आणि कर्जे दिल्याने होणारा खर्च होय. भांडवली जमा म्हणजे कर्ज घेऊन किंवा कर्ज परत मिळवून आणि मालमत्ता विकून मिळालेला पैसा होय. शासकीय मालमत्ता विकणे म्हणजेच निर्गुंतवणूकीकरण करणे होय. भांडवली जमा मध्ये कर्ज उभारणी, इतर देणी, कर्ज पुनर्प्राप्ती, इतर मिळकत यांचा समावेश होतो.
भांडवली खर्चाचे विभाजन योजना खर्च व गैरे योजना खर्च असे केले जाते. योजना खर्चात भूमिअधिग्रहण, यंत्र साधना वरील खर्च, इमारत बांधकाम, सार्वजनिक उपक्रमांच्या शेअर्समधील गुंतवणूक इत्यादींचा समावेश होतो. गैर योजना खर्चात सरकारने पुरवलेल्या विविध सेवा वरील भांडवली खर्चाचा समावेश होतो.
अर्थसंकल्पाचे प्रकार –
१) समतोल अर्थसंकल्प
२) शिलकी अर्थसंकल्प
३) तुटीचा अर्थसंकल्प
१) समतोल अर्थसंकल्प – शासकीय अर्थसंकल्पात जेव्हा खर्च व उत्पन्न यांच्यामध्ये समतोलता साधलेली असते तेव्हा त्याला समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात.
२) शिलकी अर्थसंकल्प – अर्थसंकल्पात मांडलेल्या आकडेवारीत सरकारचे उत्पन्न हे होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक मांडलेले असते तेव्हा त्याला शिलकी अर्थसंकल्प असे म्हणतात.
३) तुटीचा अर्थसंकल्प – सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात जेव्हा खर्च जास्त असतो व मिळणारे उत्पन्न कमी असते, अशा स्वरूपाच्या अर्थसंकल्पाला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात.
आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प फायदेशीर ठरतो.
म्हणून भारतासारख्या विकसनशील देशात तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो.
एकूण उत्पन्नामध्ये महसुली जमा व भांडवली जमा यांचा समावेश असतो. तर एकूण खर्चामध्ये महसुली खर्च व भांडवली खर्च यांचा समावेश होतो.
तुटीच्या संकल्पना –
महसुली तूट = महसुली उत्पन्न – महसुली खर्च
अर्थसंकल्पीय तूट = एकूण उत्पन्न – एकूण खर्च
राजकोषीय तूट = एकूण खर्च – (महसुली जमा + कर्जेतर भांडवली जमा)
राजकोषीय तूट म्हणजे एकूण उत्पन्नापेक्षा सरकार किती जास्त खर्च करीत आहे ती रक्कम होय. असा जास्तीचा खर्च भागवण्यासाठी सरकारने एका वर्षात घेतलेली एकूण कर्जे म्हणजेच सरकारची राजकोषीय तूट होय.
प्राथमिक तूट = राजकोषीय तूट – घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च.
तुटीचा अर्थ भरणा –
१) नवीन चलन निर्मिती
२) RBI कडून कर्ज
३) संचित रोख पैशातून पैसे वापरणे.
तुटीचा अर्थसंकल्प भाववाढ घडवून आणणारा असतो. त्यावर योग्य नियंत्रण असणे आवश्यक असते. राजकोषीय तूट व महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर कायद्याने बंधन आणण्याच्या दृष्टीकोनातून (Fiscal Responsibility And Budget management Act 2003) FRBM कायदा 2003 करण्यात आला. भारतीय अर्थसंकल्प.